Thursday, 13 December 2012

रत्नागिरी
                         रत्नागिरी हे नाव निश्चित कसे पडले ह्याच्या माहिती नाही . पण ऐकीव माहिती नुसार "रतनगिरी" नावाचे साधू विजापूर हून येथे आले , त्यांच्या वरून हे नाव पडले असचे असे मानण्यात येते.
रत्नागिरी जिल्ह्याची विभागणी तीन विभागात होते . विभाग पहिला - रत्नागिरी शहर , विभाग दुसरा गणपतीपुळे ते जयगड आणि विभाग तिसरा भाट्ये ते राजापूर .
 विभाग पहिला - रत्नागिरी शहरामध्ये भगवती(रत्नदुर्ग ) किल्ला, काळा  - पांढरा समुद्र , लोकमान्य टिळक जन्मस्थान , पतित पावन मंदिर , सावरकर स्मारक , थिबा प्यालेस ,सावरकर कोठडी .

 भगवती ( रत्नदुर्ग ) किल्ला


                रत्नदुर्ग , रतनगड किंवा भगवती किल्ला या नावानी ओळखला जाणारा हा किल्ला शिलाहार कारकिर्दीत गोव्याचा  राजा विजय मार्क देव याचा मुलगा भोजदेव  (राजा भोज ) याने इ .स .१२०५ मधेय बांधला अशी माहिती  मिळते.  घोड्याच्या नालासारखा आकार असलेला १०२ एकर क्षेत्रफळाचा हा किल्ला सुपारे १३०० मीटर  लांब आणि १००० मीटर  रुंद आहे . एकूण २७ बुरुज असलेल्या ह्या किल्ल्याचे सामान्यपणे तीन भाग पडतात - पेठ किल्ला , परकोट , आणि बालेकिल्ला . लांबवर पसरलेली किल्ल्याची दगडी तटबंदी , उजवीकडे खालच्या बाजूला काळा  समुद्र , मांडवी नदी , भाट्याचा खाडी पूल , सुरूबन, थिबा point, अतर डावीकडे भगवती बंदर , पांढरा  समुद्र , आणि मुख्य म्हणजे तीन भागात पसरलेला संपूर्ण किल्ला आमि अमर्याद विस्ताराचा निळाशार सागर .......... खरे तर वर्णन करू तितके थोडेच !!        

 काळा आणि  पांढरा  समुद्र

                 भगवती किल्ल्यावरच्या  दीपस्तंभाच्या उंचीवरून शहराकडे तोंड करून उभे राहिल्यास एकाचवेळी डाव्या बाजूस पंधरा तर उजवीकडे काळा  समुद्र दिसतो. रेती पांढरी असल्याने पाणी पांढरे आहे तर दुसरीकडे काळी रेती असल्याने पाणी काळी  दिसते . काळा समुद्र असलेला भाग म्हणजे मांडवी बंदर , या बंदरावर मुंबईच्या गेट  वे ऑफ इंडिया च्या धर्तीवर गेट वे ऑफ रत्नागिरी अशी प्रवेश कमान उभारण्यात आलेली आहे.

लोकमान्य टिळक जन्मस्थान

टिळकांचा जन्म रत्नागिरी शहरात २३ जुलै १८५६  रोजी  टिळक आळीत  झाला. टिळकांचे मुल गाव दापोली -दाभोळ रस्त्यावर चिखलगाव ज्या ठिकाणी आता त्यांच्या घराच्या जोत्यावर टिळक मंदिर आहे . जन्मानंतर टिळकांचे रत्नागिरी मधेय १०  वर्ष वास्त्याव्य होते .
                                                                                                                                                                                                      

Sunday, 12 August 2012

गणपतीपुळे


                                मुंबईतून रत्नागिरी कडे जायला निघाल्यावर वाटेत एक निवळी फाटा लागतो तिथून गणपतीपुळे पर्यंत साधारण ३५ किलो मीटर चा वळनावळनांचा रस्ता आहे. पर्यटकांचे अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. इथले गणेश मंदिर , विस्तीर्ण सागर तीर , हिरवाई आणि कोकणी पाहुणचार ह्यामुळे ह्या स्थानाला पर्यटकांची जास्त पसंती मिळते. 
                                 गणपतीपुळ्याच्या गणेश स्थापनेमागची कथा सुमारे ४५० वर्षांपूर्वीची आहे. आज ज्या ठिकाणी देऊळ आहे त्या ठिकाणी पूर्वी केवड्याचे बन होते.   जवळच्या उंडी गावातील एक ब्राह्मण वास्तव करण्याच्या उद्देशाने इथे आले , मोगलाइच्या काळात त्यांच्यावर संकट कोसळले, गणेशभक्त असणाऱ्या ह्या ब्राह्मणाने मनोभावे मंगल मूर्तीची पूजा केली , आणि ' संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करेन ' असा निश्चय करून इथल्या केवड्याचा बनत उपासना सुरु केली . " मी  आगरगुळ्याहून( पावस जवळील गणेशगुळे) पुळ्यास आलो आहे. दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त असे माझे स्वरूप असून माझे निराकार स्वरूप डोंगर आहे , माझी सेवा , पूजा अर्चा कर म्हणजे तुझे संकट दूर होईल " , असा दृष्टांत त्यांना उपसानाकाळात झाला. त्यानुसार केवड्याच्या बनत शोध घेतल्यानंतर त्यांना दृष्टांतानुसार श्री गणेशाची मूर्ती सापडली , त्यावर केंबळी छप्पर उभारून त्या ठिकाणी श्री गणेशाची पूजा अर्चा सुरु झाली. 
                         हा दृष्टांत आणि गणपतीपुळयास  सापडलेल्या श्री गणेश मूर्तीचा संबंध पावस जवळील गणेश गुळे येथील मंदिराशी जोडलेला आहे . ज्यावेळी ब्राह्मणास दृष्टांत होऊन मूर्ती सापडली त्याच सुमारास गणेश गुळे मंदिरातील पाण्याचा नैसर्गिक झरा बंद झाला , त्यामुळे "गुळ्याचा गणपती पुळ्यास" गेला  अशी म्हण म्हटली जाते. समुद्राच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर म्हणजे पुळणीवर गणपती प्रकट झाला म्हणून "गणपतीपुळे " हे नाव पडले .हिंदुस्थानच्या आठ दिशांना द्वारदेवता आहेत . त्यापैकी पुळ्याचा गणपती हे पश्चिमद्वार देवता मानली जाते.
                        श्री गणेश मंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्तसमयीची किरणे थेट गणेशमूर्तीवर  पडतात .  
                  असे हे गणपतीपुळे पर्यटकांचे  अतिशय लोकप्रिय ठिकाण ! इथे पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे , तरीही येणाऱ्या पर्यटकांनी भक्ती स्थानाचे पावित्र्य आणि इथला निसर्ग सांभाळणे हे त्यांचे कर्तव्य आहे. 
                         

Thursday, 5 July 2012

काताळे  जेट्टी
             धोपावे -दाभोळ येथे असणाऱ्या फेरीबोट  प्रमाणेच तावासाळ च्या पुढे  काताळे येथे फेरी बोट सेवा सुरु करण्यात आली आहे. यामधून वाहने घेऊन पलीकडे सैतवडे गावात जाता येते . तिथून केवळ 15-16 किलोमीटर वर जयगड , गणपतीपुळे  , आणि रत्नागिरी अशा ठिकाणी जाता येते. किंवा बोटीने थेट जयगड बंदरात सुद्धा जाता येते. 

राई  - भातगाव पूल 
रत्नागिरी कडे जाताना  राई  - भातगाव पूल 

           गुहागर तालुक्यातील टोकाचे गाव म्हणजे भातगाव आणि रत्नागिरी तालुक्यातील राई या गावांना जोडणाऱ्या पुलामुळे गुहागर - रत्नागिरी हे अंतर 50किलोमीटर ने कमी झाले आहे. तव्सालच्या पुढे भातगाव मार्गे जाणारा रस्ता फारच रमणीय आहे. कधी दोन्ही बाजूला दात झाडीचे डोंगर तर कधी एका बाजूला खोल दरी जंगलातून जाणारा नागमोडी रस्ता कधी संपतो ते काळातही नाही . 
         काताळे जेट्टी  आणि राई भातगाव पुलामुळे थेट गणपतीपुळे , मालगुंड , जयगड , या स्थळांना भेट देऊन रत्नागिरीस जाणे फारच सोयीचे झाले आहे. या सोयी पर्यटकांसाठी निश्चितच स्वागतहर्या  आहेत.   

Thursday, 28 June 2012

चिपळूण मधील पर्यटन स्थळे :
श्री क्षेत्र परशुराम 
       मुंबई - गोवा महामार्गावर खेड नंतर  चिपळूणच्या अगोदर 10 किलोमिटर  डाव्या बाजूस रस्त्याने वर गेल्यावर आपण श्री क्षेत्र परशुराम इथे पोहोचतो . या रस्त्याला परशुराम घाटी असेही म्हणतात .
      विष्णूंचा  सहावा अवतार मानलेले भगवान परशुराम हे जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचे सुपुत्र . त्यांचे मुळ  नाव भार्गवराम . परंतु परशु या शास्त्राने त्यांनी शत्रूंचा नाश केला म्हणून त्यांना सर्व परशुराम म्हणून लागले. त्यांनी जिंकलेली सर्व भूमी कश्यप ऋषींना दान केल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी समुद्र मागे हटवून जी भूमी निर्माण केली तेच आजचे "कोकण ". त्यानंतर श्री परशुराम महेंद्र पर्वतावर स्थायिक झाले आज त्याच जागी परशुराम मंदिर उभे आहे . मंदिराच्या सभोवताली  दगडी तट  असून आत येण्यासाठी प्रमुख आणि दुसर्या बाजूला लहान दरवाजे आहेत. परशुराम मंदिरात मध्यभागी परशुरामाची , डावीकडे कामाची आणि उजवीकडे काळाची  मूर्ती आहे.  

सवतसडा 


परशुराम घाटिनंतर सपाटीला लागण्यापूर्वी डाव्या हाताला एक सुंदर धबधबा ऐईन पावसाळ्यात बघायला मिळतो . कड्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी , खालून वाहणारा  खळखळता ओढा  आणि आजूबाजूची हिरवाई यामुळे इथे थांबणे अपरीहार्य ठरते. सवतीमत्सरातून दोन्ही सवतीनचा या कड्यावरून खाली पडून  अंत  झाला . म्हणून यास "सवतसडा" असे वेगळेच नाव पडले  असावे.   

डेरवण शिवसृष्टी 


चिपळूण पासून 20 किलोमिटर  अंतरावर वालावलकर  ट्रस्ट मार्फ़त छत्रपति शिवाजी महाराजांच्या जिवनातील स्फूर्तिदायी प्रसंगावर आधारित शिवसृष्टि उभारली आहे. सिमेंट मधेय घडवलेल्या मुर्त्यांद्वारे मंडपाच्या भिंतीवर शिवजन्म , आग्र्याहून सुटका , अफजलखानाचा वध , शायीस्तेखानाचे पलायन अशा अनेक प्रसंगांचे देखावे उभे केले आहेत. महाराष्ट्राचा चैतन्यदायी इतिहास नव्या पिढीला ज्ञात करून देण्यात शिवसृष्टी चा हेतू सध्या होतो. 


श्री विन्ध्यवासिनी देवी 


नंद आणि यशोदेची मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव देवकीच्या कोठडीत पोहोचली तिला कंवसाने ठार मारण्यासाठी उचलले तेव्हा ती त्याच्या हातून निसटली आणि विन्ध्य पर्वतावर जावून राहिली तीच  ही विन्ध्यवासिनी.
देवीची मूर्ती 800-1000 वर्ष जुनी असून मूर्तीला   8 हात आहेत   आणि मूर्ती महिषासुरमर्दिनी रुपात आहे.
असे हे चिपळूण शहरही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.  

Thursday, 14 June 2012

श्री वेळणेश्वर   मंदिर - गुहागर  
श्री वेळणेश्वर 
           वेळणेश्वर या समुद्र काठच्या गावाला सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. गुहागर पर्यटन स्थळा मधेय  वेळणेश्वर गावचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तीव्र उतारांचा वळनावळनांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो.  वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर गाव आहे. सुमारे  1200 वर्षांपूर्वीपासून गाव इथे वसलेले आहे.  वेळणेश्वर  मंदिराचा इतिहास  म्हणजेच या गावाचा इतिहास आहे. 
श्री वेळणेश्वर मंदिर  
           सभोवताली नारळ - पोफळीच्या बागा , सुरक्षित  आणि स्वच्छ समुद्र किनारा आणि लाटांच्या गाजेचे पार्श्वभूमीवर  वेगळेपण जाणवते. वेला  म्हणजे समुद्र किनारा , त्या तीरावर असणारा देव तो  वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून  वेळणेश्वर . येथील  गावकऱ्यांच्या मते 12 व्या शतकात इथे छोटे मंदिर होते त्यावेळी त्यास " वेळोबा " म्हणत. 
              मंदिर आवर खूपच मोठे आहे. त्यामाधेय 9-10 मित्र उंचीची दीपमाळ  आहे. घुमटाकार  शिखराचा सभामंडप , बाहेर पितळी  ओटा , त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे  आणि त्यावर पाच फन्यांचा  नाग आहे. गाभाऱ्यात  अडीच - तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवट ठेवून पोशाख  घालतात शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर  कालीमाता , महिषासुरमर्दिनी , गोपाळकृष्ण यांच्या पंच धातूच्या तर विठ्ठल रखुमाई ची पाषाण  मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागुनच श्री काळ भैरव , श्री  गणपती , श्री लक्ष्मि नारायण अशी मंदिरे आहेत . स्थानिक  लोक या काळ भैरवाला कौल  लावताना पहायची संधी मिळाल्यास ती जरूर बघावी. 
 वेळणेश्वर समुद्र 
          वेळणेश्वर समुद्र किनाऱ्याचा विशेष उल्लेख करावा लागेल , स्वच्छ आणि सुरक्षित अशा समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे त्याला " मेरुमंडल "   म्हणतात. 
             इथे  येणाऱ्या  पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स वगैरे  आहेत. तसेच  वेळणेश्वर  भक्त निवसातही उत्तम सोय  होऊ शकते. अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवीच !  

Thursday, 7 June 2012

हेदवी - श्री दशभुज गणपती 
          गुहागर पासून २५ किलोमीटर अंतरावर हेदवी हे गाव आहे. किल्लेवजा तटबंदीने वेढलेले थोड्या उंचीवरील गणेश मंदिर. वर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि थेट प्रवेशद्वारापर्यंत रस्ताही आहे. दगडी तटबंदी , आजूबाजूचा परिसर , फुलबाग आणि पाश्वभूमीवर दिसणारी मंदिराची दगडी वास्तू यामुळे  प्रथम दर्शनीच पर्यटक प्रेमात पडतो. इतर पर्यटन स्थळांप्रमाणेच हेदवी गणेशाची पण काहीशी कथा सांगितली जाते. 
मंदिर 
     पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे गणेशभक्त राहत होते. त्यांची पुण्याला पेशव्यांशी भेट झाली असता त्यांना वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना त्या काळी मंदिर बांधण्यासाठी १ लाख रुपये दिले . त्या पैशातून केळकर स्वामिनी हे मंदिर उभारले. गणपतीची मूर्ती काश्मीर मधील पाषाणापासून बनवलेली आहे. दहा हातांच्या या मूर्तीच्या मांडीवर सिद्धलक्ष्मि विराजमान आहेत. उजव्या वरच्या हातात चक्र , दुसऱ्या हातात त्रिशूळ , तिसऱ्या हातात धनुष्य , चौथ्या हातात गदा आणि पाचव्या आशीर्वादाच्या हातात महाळूंग फळ आहे. डाव्या हाताच्या वरच्या हातात कमाल , दुसऱ्या हातात पाश , तिसऱ्या हातात नीलकमळ , चौथ्या हातात रदन (दात ) , आणि पाचव्या हातात धान्याची लोंबी आहे. सोंडेत अमृतकुंभ म्हणजे कलश आहे. मूर्तीचे कोरीवकाम उत्कृष्ट असून गळ्यात अनेक प्रकारच्या माळा आहेत. सिंव्हासनावर उंदीरही कोरलेला आहे. सभामंडपात गाभाऱ्याच्या प्रवेशभिंतीवर जय विजय या द्वारपालांच्या चतुर्भुज मूर्ती आहेत आणि बाहेरील बाजूला पिसारा फुलवलेल्या मोराच्या प्रतिमा आहेत.  मंदिर आवारातच दीपमाळही आहे 

Thursday, 31 May 2012

बामणघळ  - हेदवी
                      हेदवीच्या समुद्र किनाऱ्यावर , सुरुच्या दाट सावलीत समुद्रावरचा भन्नाट वारा घेत निवांत बसने हा एक सुखद अनुभव आहे. या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग चमत्काराचे एक रौद्र दर्शन घडते. समुद्राकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या बाजूला दिसणाऱ्या उमा - महेश्वराच्या मंदिराच्या बाजूने डोंगराच्या कडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी  भेग दिसते. येथे डोंगरावर वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी धडकून एक अरुंद घळ तयार झाली असून येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. या कपारीत पाणी घुसून जोरात वर उसळते. 
                       या ठिकाणी गावातील लोकांकडून एक कथा ऐकायला  मिळते , वेळ रात्रीची होती , कोणी एक ब्राह्मण या वाटेने चालला होता , या घळीची त्यास माहिती नव्हती . त्याचा पाय घसरला आणि या घळीने त्यास पोटात घेतले .तेव्हापासून बहुतेक याला  "बामणघळ " असे नाव पडले.  

बुधल सडा 


अर्धवर्तुळाकार उथळ  पुळण  
            बुधल हे सर्वसामान्य पर्यटकांना फारसे  माहिती नसणारे ठिकाण . गुहागर पासून साधारण २० किलोमीटर अंतरावर. बुधालाची अर्धा कि.मी. लांबीची अर्धवर्तुळाकार उथळ  पुळण हेच या गावाचे प्रमुख आकर्षण आहे. 
प्रवाळयुक्त दगड  (Basalt rocks)
             येथील निळे पाणी इतके स्वच्छ आणि नितळ आहे कि पाण्याखालची दोन - तीन फुटावरची जमीन दिसते. बाजूला दोन्हींकडे उंच टेकड्या आणि मध्ये छोटीशी पुळण आहे. टेकडीच्या बाजूला  खडकांवर लाटांचे सतत थैमान सुरु असते. कपारीत जावून घुसळणारे पाणी , २-३ मी. उंच उडणारे शुभ्र कारंजे न त्याच्याशी होणारे काळ्या दगडांची टक्कर , अत्यंत सुंदर दृश्य बघावयास मिळते. परंतु हे दृश्य दुरूनच पाहणे योग्य , कारण हा प्रवाळयुक्त दगड आहे.    
   

Thursday, 17 May 2012

गोपळ गड  - गुहागर 


गोपाळगड 
               गुहागर गावापासून  अंजनवेल गावातून  थेंट  किल्ल्यापर्यंत गाडी जाते. तसेच हौशी पर्यटक  अंजनवेल     गावातून  किल्ला चढूनही जाता येतें. काहींच्या मते , आंग्रे काळात या किल्ल्याचा  किल्लेदार गोपाळराव यांच्या नावा वरून  गोपाळगड  हे  नाव पडले असावे . किल्ल्याच्या भक्कम तटबंदित  एकूण बारा बुरुजे आहेत . पूर्वेला आणि पश्चिमेकडे  दोन दरवाजे आहेत . दरवाज्याच्या दोन्ही बाजूस  पहारेकर्यांच्या  देवड्या आहेत. जसजसे किल्ल्याच्या आत प्रवेश करू तसे एक एक  अवशेष दिसु  लागतात. किल्लेदाराच्या वाड्याचे , कोठीचे  अवशेष आणि तीन विहिरी आणि अनेक छोटी मोठी जोती नजरेस  पडतात .  तटबंदिवर गवताचे रान नसेल तर संपूर्ण किल्ल्याभोवती फिरता येते. फिरतांना समुद्र , दाभोळची खाडी , वासिष्टी नदी , एनरोन प्रकल्प , पायथ्याशी अंजनवेल , धोपावे , नवानगर   असे मोठे नयनरम्य दृश्य दिसतें . 


उरफाटा गणपती 


               गुहागर  येथील कोळी समाजातील लोकांना समुद्रात एक गणेशमूर्ती सापडली होती. सर्वांनी मिळून या गणेशाची प्रतिष्ठापना केली. एकदा समुद्राला भरती येऊन गुहागर बुडण्याची वेळ आली असताना ग्रामस्थांनी या गणपतीची आराधना केली. त्या वेळी पूर्वाभिमुख गणेशाने आपले तोंड पश्चिमेकडे करून समुद्राची दिशा बदलल्याची दंतकथा आहे. त्यामुळे या गणपतीचे नाव  ‘उरफाटा गणपती’ असे पडले. या गणपतीची प्रतिष्ठापना सुमारे तीनशे वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येते. हा गणपती खरे कुळाचा आहे. खरे घराण्यातील सदस्य हे मातीच्या मूर्तीची पूजा भाद्रपद गणेश चतुर्थीला न करता घरातील पितळेची मूर्ती घेऊन किंवा नर्मदेचा गणपती म्हणून लाल दगडाची पूजा करतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. ही मूर्ती पांढरी शुभ्र आहे. या मूर्तीची उंची जवळपास अडीच फूट असून चतुर्भुज संबोधली जाणारी ही गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे

      

Thursday, 10 May 2012

                                                                      श्री व्याडेश्वर मंदिर 
                  गुहागर गावात गेल्यावर गावाच्या बाजार पेठेतच श्री व्याडेश्वर चे मंदिर आहे . गुहागर मधेय पूर्वी खूप    वाड्या होत्या . त्या वाद्यांचा देव म्हणून व्याडेश्वर किंवा वाडा  म्हणजे  तबेंल्याजवळ हे लिंग सापडले म्हणून व्याडेश्वर नाव पडले अशा कथा गुहागरवासी सांगतात . संपूर्ण दगडी बांधकाम केलेल्या या मंदिराला दगडी तत्बंदीही आहे. या तटबंदीतून आत प्रवेश केल्यावर एका बाजूला गरीद आणि दुसर्या बाजूला मारुती अशा मूर्ती आहेत. 
            मंदिर आवारात तीन दीपमाळा  आहेत. सभामंडपात तीन - साडेतीन  फुटाचा पाषाणाचा नंदी  आहे . गाभाराच्या मध्यावर 1.5 मी लांब आणि 1 मी उंच अशी काळ्या पाषाणातील शिवपिंडी असून त्यावर सुरेख कोरीवकाम असलेल्या तांब्याच्या नागराजाची प्रतिमा आहे. पिंडीवर त्रिशूळ  ठेवलेला आहे. 
            इतर अनेक मंदिरांप्रमाणे या मंदिरालाही सुरस पुराणकथा आहेत . कोण्याकळी इथल्या शिवलिंगांचे तीन कडपे उडाले , एक असगोलिचा वाळकेशवेर (वाळूकेश्वेर ) , दुसरा अदूरचा टाल्केश्वेर आणि तिसरा अनजन्वेलचा उडालेला उदालेश्वेर . गुहागरचा प्रसिद्ध होळीचा सन हा मंदिर परिसरात साजरा होतो . गुहागरच्या निसर्गसौन्दर्यबरोबरच व्यादेश्वेराचेही महात्म्य आहे.        

Thursday, 3 May 2012

                                                                 श्री दुर्गा देवी मंदिर 

दुर्गा देवी - गुहागर 

देवीचा खांब 
              
                  गुहागर ह्या गावाची विभागणी एकूण  तीन  भागात  झालेली आहे. खालचा पाट ,  वरचापाट , आणि देव पाट . ह्यापैकी  वरच्या पाटाट दुर्गा देवीचे मंदिर आहे. गुहागर वेलदूर रस्त्यावर वरच्या पाटात  एक रंगीत  खांब दिसतो याला देवीचे खांब म्हण्तात  . इथूनच  दुर्गा देवी मंदिराचा रस्ता आहे .  सध्याचे मंदिर हे पेशवेकालीन आहे. अलीकडेच देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला . आता थेट मंदिरापर्यंत वाहने पोहोचू शकतात. 
देवीच्या मंदिरासमोरील  तळे 
              देवीचे मूळ  स्थान तेराव्या शतकातील आहे. पुण्याच्या कोण्या एका भक्ताने एक  संगमरवरी आणि एक  काळ्या पाषाणाची मूर्ती करवून आणल्या. त्यातील  एक  गुहागर येथे स्थापित  केली . मंदिर पुर्वाभिमुख असून  प्रथम  दुमजली सभामंडप , नंतर दुसरा सभामंडप आणि गाभारा अशी रचना आहे. 
             दोन फूट चौथऱ्यावर सुमारे  पाऊ ण  मिटर  उंचीची अष्टभूजा महिषासुरमर्दिनी रूपातील पंढरी संगमरवरी मूर्ती आहे. देवीच्या मागे सुंदर कोरीवकामं  केलेली पितळी  प्रभावळ  आहे. सभामंडपात कोरीवकाम  केलेले लाकडी खांब आहेत . देवी समोर 300 तें  400 वर्षापूर्वीचा अश्वतथ  वृक्ष  आहे. त्यास " अश्वतथ  नारायण " म्हणतात. याच परिसरात चारही बाजूने पायर्या असलेले मोठे तळे  आहे. 
     नवरात्र आणि धुळवडीच्या दिवशी देवीचा मोठा उत्सव असतो. आता नव्याने मंदिराच्या परिसरात  भक्तनिवासाची सोय  केलेली आहे.               
                

Friday, 27 April 2012

गुहागर
                               गुहागर नाव हे काहीश्या पुराण कथेवरून आहे असे समजले जाते. गुह म्हणजे कार्तिकस्वामी आणि त्यांनी सव्रक्षण केलेले आगर म्हणजे गुहागर . तसेच गुहा म्हणजे बुद्धी तिचे आगर म्हणून गुहागर अथवा , पूर्वी गुहागर येथे मोठ्या प्रमाणावर गो (गाय ) गृहे (गोठे ) होते म्हणजे गुहागर . इतकी विविधता नावात आढळते. समुद्रकिनारपट्टीला  लागून असलेले गुहागर हे छोटेसे निसर्गरम्य गाव . गावाची रचना अत्यंत सुंदर आहे. गुहागर गाव हे एकूण ३ भागात विभागलेले आहे. खालचा पाट , वरचा पाट आणि देवपाट .एकच सलग रस्ता ,दुतर्फा नारळाची , सुपारीची झाडे आणि कौलारू घरे.  
                              गुहागरला पाहण्याजोगी बरीच ठिकाणे आहेत , व्याडेश्वर मंदिर , दुर्गा देवी मंदिर , उरफाटा गणपती , गोपाळगड ,बामनघळ ,  हेदवीचा दशभुजा गणपती , वेळनेश्वेर मंदिर.तसेच गुहागर ला जाताना वाटेत चिपळूण शहर लागते तिथेही अनेक पर्यटन स्थळे आहेत . परशुरामचे परशुराम मंदिर , डेरवण येथील शिवसृष्टी , सवतसडा धबधबा आणि विन्ध्यवासिनी देवीचे मंदिर. 
                             गुहागर मुंबई पासून साधारण ७ तासाच्या अंतरावर आणि पुण्यापासून ६ तासाच्या अंतरावर आहे.  मुंबई आणि पुण्याहून गुहागरला दापोली मार्गेही जाता येते , मुंबई - दापोली आणि दापोली हून दाभोळ ला जावून दाभोळ  ते धोपावे अशी जेट्टी मार्गे जाता येते. याशिवाय गुहागर ला जाण्यासाठी कोकण  रेल्वे चा पर्यायहि उपलब्ध आहे.  चिपळूण स्थानकावर उतरून तिथून ,  ST बस ने गुहागर ला जाता येते .  

Thursday, 12 April 2012

                                                                              वेळास  
          मुंबई दापोली रस्त्यावर दापोली कडे वळण्याऐवजी  सरळ मंडणगड वरून गेल्यावर वेळास हे छोटसं गाव लागते. नारळ , सुपारी , आंबा यांच्या झाडीत  वेळास हे गाव हरवले आहे. नाना फडणवीसांचे हे गाव .
 गावात प्रवेश करतानाच उंच दगडी जोत्यावर  नाना फडणवीसानी जीर्णोद्धार केलेली महादेव आणि  काल भैरव अशी दोन मंदिरे आहेत. रस्त्यापासून वर  चढून जाण्यास मोठ्या दगडी पायऱ्या आहेत. उजवीकडे दोन दीपमाळा आहेत . याशिवाय गावात दुर्गादेवीचे देऊळ आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध षष्टीला देवीचा उत्सव असतो. 
           गावातील मुख्यारास्त्याने सरळ गेल्यावर नाना फडणविसांच्या  वाड्याचे दगडी जोते दिसते. जोत्याच्या मध्यभागी दगडी चौथरा बांधून त्यावर नाना फडणवीसांचा अर्धा पुतळा बसवलेला आहे. 
     वेळासच्या निसर्ग्यारम्य समुद्र किनाऱ्यावर थंडीच्या शेवटी आणि उन्हळ्यात " ओलिव्ह रिडले टर्टल "  महोत्सव साजरा केला जातो. हल्लीच्या काळात ह्या कासवांची जात नष्ट होण्याच्या मार्गात आहेत .  म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ  ह्या संस्थे  अंतर्गत  हा कासव महोत्सव केला जातो. देश - परदेशातून अनेक कासव प्रेमी येथे भेट देतात . 
          ह्या छोट्याश्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावात राहण्यासाठी हॉटेल नाही परंतु खाजगी राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते.  

Friday, 6 April 2012

                                                           दाभोळ 
                दापोली पासून १ तासाच्या अंतरावर असणारे दाभोळ बंदर. पूर्वीच्या काळी , मुंबईहून येणार्यांना दाभोळ बंदरातच उतरावे लागे. प्राचीन काळी "दालभ्य" ऋषींच्या नावावरून दाभोळ हे नाव पडले असेल असे येथे मानले जाते. दाभोळ गावात शिरताना अनेक मनोहारी दृश्य पाहून वेड लागते. चिपळूण कडून येणारी वाशिष्टी नदी , समोर दिसणारा गोपाळगड, सुरूचे दाट बन , उंच माड आणि सूर्योदय , सूर्यास्ताच्या वेळी तर हे शोभा अवर्णीय असते.
श्री परशुराम पुतळा , बुरोंडी 
तामसतीर्थ 
      दापोली हून दाभोळ ला जाताना पर्यटकसाठी  अनेक निसर्ग्यरम्य ठिकाणे आहेत. बुरोंडी , लाडघर , कोळथरे आणि दाभोळ चे चंडिका मंदिर. वर्षाभारापुर्वीच बुरोंडी येथे श्री परशुरामाचा पुतळा बांधण्यात आलेला आहे. आणि तेव्हापासून ह्या भागाला चित्पावन भूमी म्हणून ओळखले जाते. तसेच ह्याच पुतळ्याच्या इथून दिसणारे तामसतीर्थ. तामसतीर्थ म्हणजे फोटोग्राफर साठी आणि पर्यटकांसाठी मेजवानीच . ह्याला तामसतीर्थ म्हणतात कारण येथील माती हि लाल (तांबड्या रंगाची ) आहे, त्यामुळे  पावसाळ्यात समुद्राच्या लाटांनी तिथल्या पाण्याच्या रंग लालसर होतो .लाडघर येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. बुरोंडी -लाडघर असा अत्यंत सुंदर समुद्रकिनारा आहे.
      लाडघर वरून तसेच सरळ पुढे गेल्यावर वाटेत कोळथरे गाव लागते. गाव अत्यंत छोटे आणि नारळ , सुपारीच्या बागांनी समृद्ध. गावात श्री कोळेश्वराचे मंदिर आहे. श्री कोळेश्वराचे मंदिर ३ भागांचे असून त्याभोवती दगडी फरसबंदी  आहे.संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आहे, ह्या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे . जगभर  प्रसिद्ध असलेली " आगोम  "  www.agom.in हे सूक्ष्म आयुर्वेदिक कंपनी . कोळथरे सारख्या छोट्या गावात ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेली हि कंपनी आहे. तसेच गावात कोळथरे पर्यटन विकास संघातर्फे घरातून राहण्याची आन भोजनाची सोय केली जाते.
चंडिका देवी 
    कोळथरे गावाहून सरळ गेले कि वाटेत चंडिका मंदिर लागते. दाभोळ च्या अलीकडे पठारावर चंडिका देवीचा स्वयंभू स्थान आहे.  एकसंथ दगडात नैसर्गिक गुहेमाधेय देवीची साडे ३ फुट , काळ्या पाषाणातील शेंदूर लावलेली  मूर्ती आहे. देवीला ४ हात असून हातात तलवार, ढाल अशी आयुधे आहेत. देवीचं मूर्तीजवळ एक इतिहासकाली तलवार असून ते छत्रपती शिवाजी महाराजांची आहे अशी पुजार्यांची श्रद्धा आहे. गुहेत जाताना ५-६ पायर्या उतरून आत जावे लागते.  गुहेत समई च्या प्रकाशात जावे लागते, या देवीला फक्त समई मंद प्रकाश चालतो  आणखी कोणताही चालत नाही असा येथील पुजारी सांगतात . इथून सरळ गेले कि दाभोळ बंदर येते .
     दापोली , कोळथरे , बुरोंडी , लाडघर या सर्व ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी भोजनाची आणि राह्यची सोय केली जाते. 

Friday, 30 March 2012

केळशी 
            दापोली पासून एक तासाच्या अंतरावर असणारे , भारज्या नदीच्या खाडीलगत वसलेले  केळशी गाव. गावाच्या दोन्ही बाजूने पाणी असल्याने गाव बेटासारखे दिसते . निसर्गसमृद्ध आणि आणि अत्यंत  सुंदर सागराने गावाचे सौदर्य वाढले आहे. 
         गावात एक गणपतीचे देऊळ आहे. पेशवेकालीन हे गणपतीचे मंदिर आहे. गाब्पतीचे संगमरवरी मूर्ती आहे. यालाच " पांढरा गणपती " असेही म्हणतात देवळाच्या डावीकडे एक समाधी मंदिर आहे. आणि उजवीकडे  काळ्या दगडातील पुष्करणी आहे. भिंतीत दिवे लावण्यासाठी कोनाडे आहेत. येथे माघातील गणेशोस्तव पारंपारिक पद्धतीने साजरा होतो. 
 देवीचा रथ 
देवळाला असणारे दोन घुमट 
         केळशी , मुरुड , आंजर्ले आणि वेळास ह्या चारही गावात दुर्गा देवीची देवळे आहेत . असा म्हंटले जाते कि ह्या चारही बहिणी आहेत. केळशीला महालक्ष्मिचे मंदिर आहे. मंदिर उत्तराभिमुख असून पेशवाई काळातील मंदिर आहे. मंदिराच्या आवारात विहीर आणि तळे आहे. तळ्यात अनेक कमले उमलेली आहेत. या देवळाला दोन घुमट असून एका घुमटाखाली महालक्ष्मिचे  स्वयंभू स्थान आहे. आणि दुसऱ्या  घुमटाखाली सभागृह आहे. सभागृहात येण्यासाठी तीन बाजूने दरवाजे आहेत. दर वर्षी चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा असा मोठा देवीचा उत्सव असतो. त्याप्रमाणेच नवरात्र उत्सवही साजरा केला जातो. ह्या उत्सवात रथयात्रा , कीर्तन असे कार्यक्रम असतात . 
     महालक्ष्मिच्या मंदिराच्या एक  किलोमीटर च्या अंतरावर इतिहासप्रसिद्ध दर्गा आहे. " हजरत याकुब बाबा सरवरी  रहामातुल्ला दर्गा "असे याचे नाव असून साधारण ३८० वर्षांपूर्वीचा हा दर्गा आहे. 
   असे हे केळशी गाव नाविन्यपूर्ण आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी गावात राहण्याची आणि जेवणाची सोय केली हाते.     

Friday, 23 March 2012

हर्णै बंदर
       दापोलीहून तासाभराच्या अंतरावर असणारे हर्णै गाव , गावात ९९% कोळी लोकांची वस्ती आहे.हर्णै बंदरालगत कोळी आणि मुसलमानांची  जास्त वस्ती आहे. दापोलीहून आसूद पुलावरून उजव्या बाजुंच रस्ता हर्णै ला जातो . वाटेत जाताना सालदुरे ,पाज पंढरी ही गावे लागतात. पाज पंढरी गावात विठ्ठल- रखुमायीचे छान मंदिर आहे.
          गावात वाटेत जाताना डाव्या बाजूला निळाशार समुद्र आणि उजवीकडे डोंगर असा विहंगम दृश्य पहावयास मिळते . पूर्वी  वाहतुकीची साधने फारशी उपलब्ध नव्हती तेव्हा जलमार्ग वाहतुकीसाठी हर्णै हे महत्वाचे बंदर म्हणून ओळखले जायचे . येथे मासेमारीचा मोठ्या प्रनामावर व्यवसाय चालतो. येथे संध्याकाळी ५-७ या वेळेत माशांचा लिलाव चालतो , तो पाह्ण्याकारातही बघ्यांची गर्दी जमते. लाखोंची उलाढाल करून हे मासे परदेशात सुद्धा निर्यात केले जातात.
         हर्णै इथे फतेगड , कनकदुर्ग , दीपस्तंभ , सुवर्णदुर्ग अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत . कनक दुर्गावरची चढण चढून गेल्यावर हर्णै दीपस्तंभ समोर दिसतो . हे दीपगृह १०० वर्षांपेक्षा जास्त पूर्वीचे असून महाराष्ट्र कोकण किनार पट्टीवरील सर्वात जुने दीपस्तंभ आहे.
          असे हे हर्णै छोटेसे , माश्यांच्या वासाने घमघमलेले बंदर . येणाऱ्या पर्यटकांची गावात अत्यंत माफक दारात राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. 

Friday, 16 March 2012

 आंजर्ले कड्यावरचा गणपती 
             दापोली पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारे आंजर्ले  गाव . नारळ पोफळी च्या बागांनी समृद्ध. पाशिमेकडे रम्य समुद्र किनारा , आणि उजवीकडे उंच डोंगरावर मंदिराचा कळस  खुणावतो . पूर्वी मंदिरात जाण्याकरता होडीतून जावे लागे. परन्तु आता ५-६ वर्षांपूर्वी नवीन रस्ता (पूल ) झाला , जो थेट मंदिराच्या पायथ्यापर्यंत घेऊन जातो. नवीन रस्त्यावरून जाताना अनेक नयनरम्य point  दिसतात . कोळ्यांचे वस्ती असणारे पाजपंढरी गाव , चकाकता समुद्र , सुवर्णदुर्ग आणि अनुपमेय सूर्यास्त .होडीतून मंदिरात जाताना ५०-१०० पायर्या  डोंगरात चढून जावे लागे. म्हणजेच खाडी  पार करून जावे लागे.म्हणूनच आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती हे नाव पडले आहे . 
         मंदिर परिसरात ६०० वर्षांपूर्वीचा बकुळ वृक्ष आहे. मंदिराचे बांधकाम लाकडी होते. मंदिर पूर्वाभिमुख असून पेशवेकालीन आहे. सभागृहाला तीनही बाजूने जाण्यास दरवाजे आहेत. वरती मोठा घुमट आहे . मंदिराच्या शेजारी शंकराचे मंदिर आहे. गणेश मूर्ती ४ फूट असून बाजूला रिद्धी सिद्धी च्या प्रतिमा कोरलेल्या आहेत , पोटाभोवती नाग असून हातात परशु आणि अंकुश अशी शस्त्रे आहेत . मुख्य म्हणजे मूर्ती उजव्या सोंडेची आहे.  माघी गणेश चतुर्थीला गणपतीचा उत्सव केला जातो. मंदिरात  येणाऱ्या पर्यटकांसाठी आवारातच भक्तनिवास आणि भोजनाची  माफक दरात सोय केली जाते. 
                                       

Friday, 9 March 2012

श्री केशवराज मंदिर 
      दापोली पासून कर्दे - मुरुड ला येताना वाटेत आसूद नावाचे अत्यंत छोटे गाव  लागते.   दापोली मुरुड रस्त्यावर आसूद गाव , अतिशय शांत -  निवांत अशा टुमदार वस्तीचे .  तिथूनच जवळ  श्री केशवराज मंदिर .डोंगरातून वाट काढत मंदिरात पोहोचावे लागते.  वाटेत जाताना बहुताव्शी दाबके आडनावाच्या कुटुंबाची  घरे लागतात . कारण आसूद हे गाव दाबके ह्यांचे आहे असे समजले जाते . गावात सर्वत्र कौलारू घरे . घराच्या मांडवावर सुपारी वळत टाकलेली दिसते.  
     नारळ , पोफळी , आंबा , काजू  ह्यांच्या गर्द झाडीतून पायवाटेने मंदिरात जावे लागते. विशेषतः पावसाळ्यात येथे अतिशय नयनरम्य दृश्य बघावयास मिळते. हिरवेगार चहूकडे .. सकाळच्या वेळेस गेल्यास निरनिराळ्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावयास मिळतो. तसेच पावसाळ्यात खळ-खळ आवाज करत  वाहणारा ओढा. 
थोड्या पाऊल वाटेने गेल्यावर छोटासा पूल आहे , त्यावरून पुढे जाता येते. पण नंतर दमछाक करणारा चढ लागतो. ह्या चढत आता पायऱ्या झाल्या आहेत. साधारण १००-१५० पायऱ्या आहेत . त्यामुळे मंदिरात पोहोचणे शक्य होते. पायऱ्या चढताना आजूबाजूच्या झाडीत करवंदाची झाडे दिसतात . दमछाक करणारी चढण चढून गेल्यावर मात्र आपण देवळाच्या ठिकाणी पोहोचतो . हे मंदिर डोंगरावर असल्याने वरती गेल्यावर थंड हवेच्या स्पर्शाने सगळा थकवा निघून जातो. 
झाडांच्या बुंध्यातून येणारे पाणी 
गोमुख 
    मंदिराच्या चारही बाजूने गर्द झाडी असलेलेला असा हा परिसर आहे. हे मंदिर पेशवेकालीन बांधणीचे असून मंदिरावर पावसापासून बचावासाठी कौलारू छप्पर घातलेले आहे. गाभाऱ्यात श्री विष्णूची मूर्ती पाहून मन प्रसन्ना होते. दक्षिणाभिमुख असलेल्या या मंदिराच्या डाव्या बाजूला गणेश मूर्ती आहे . ह्या देवळाच्या आवारात असणाऱ्या गोमुखातून बाराही महिने पाणी वाहत असते. ह्या पाण्याचा उगम त्या पाठीमागील डोंगरातून झालेला आहे. गोमुखातून वाहणारे पाणी डोंगरातल्या दोन झाडांच्या बुंध्यातून येते असे येथे संगेतले जाते, त्यामुळे ह्या पाण्याची चवही अत्यंत गोड आहे. आणि हा जिवंत झरा वर्षानुवर्ष वाहता आहे. गावात असे सांगितले जाते कि , देऊळ वरती डोंगरात असल्याने येथे रोज रात्री व्याघ्र येतो असे म्हटले जाते. रात्री वाघ देवळात वस्तीस असतो असेही सांगितले जाते. काही लोकांनी वाघाच्या पंज्याचे ठसे बघेतले आहेत. 
     येणाऱ्या पर्यटकांचे वाढते प्रमाण बघून , गावात घरोघरी  राहण्याची आणि जेवणाची सोय केलेली आहे. फक्त त्यासाठी आगाऊ १-२ तास सूचना द्यावी लागते. तसेच गावातच काही खास कोकणी मेवाही विकत मिळतो.
                                                        श्री व्याघ्रेश्वर मंदिर  
भवानी शंकर श्री व्याघ्रेश्वर कुलदेवता प्रसंनास्तु 
     आसूद गावातून  वाहणाऱ्या ओढ्याच्या काठाशी श्री व्याघ्रेश्वर मंदिर  आहे.आसूदच्या रस्त्याने पुढे गेल्यावर जोशी आळीच्या पुढे व्याघ्रेश्वर मंदिराच्या बोर्ड दिसतो.  तिथून पायऱ्या उतरून देवळात जाता येते.  व्याघ्रेश्वर भक्त निवासाच्या पाठीमागून डांबरी छोटा रस्ता थेट देवळापर्यंत जातो. पायऱ्या साधारण ४० आहेत. त्या उतरताना पुढे एक साकव लागतो. साकव म्हणजे लाकडाचा पूल , परंतू आता तिथे चांगला पूल झालेला आहे. श्री व्याघ्रेश्वेराचे मंदिर हे साधारण ८०० वर्षांपूर्वीचे असून शंकराचे जागृत स्थान आहे. तसेच अंकांचे कुलदैवतही आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर दीपमाळ दिसते, मंदिरात बाहेर काळ्या पाषाणाचा नंदी आहे. मंदिराला चारही बाजूने पाच फुटी उंचीची दगडी भिंत आहे. 
         मंदिराच्या आतील बाजूस लाकडी खांब असून त्यावर दशावतार कोरलेले आहेत . मंदिराच्या बाहेर श्री गणपती आणि श्री दत्ताची छोटी मंदिरे आहेत. देवळाच्या शेजारी एक विहीर आहे , आणि तिचे वैशिष्ट्य म्हणजे बांधकामाच्या तळाशी लाकडी चौकट असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या बाजूला दोन देवळे आहेत. एक म्हणजे काळ भैरवाचे आहे , आणि दुसरे झोलाई देवीचे आहे. 
        ह्या देवळाचा उल्लेख मराठी चित्रपट " गारंबीचा बापू " ह्यात केलेला आहे. 

Tuesday, 28 February 2012

Murud - Dapoli

दुर्गा देवी 
मुरुड -
    अत्यंत निसर्गरम्य असे कोकणातील छोटेसे गाव . दापोली पासून ११ किलोमीटर अंतरावर. नारळ पोफळींच्या बागणी समृद्ध .पश्चिमेकडे असणारी घरांची  रचना - घर मागच्या बाजूल नारळ , पोफळी , सुपारी , फणस , केळी ह्यांची वाडी  (बाग ) त्यानंतर शेत -सुरुची आणि केवड्याची बाग आणि मग शांत ,निळाशार सुंदर समुद्र. आणि पूर्वेकडील घरांची रचना घर मागच्या बाजूल नारळ , पोफळी , सुपारी , केळी ह्यांची वाडी  (बाग ) त्यानंतर शेत आणि मागच्या बाजूला डोंगर. श्री सिद्धपुरुष नावाच्या एका व्यक्तीने हे गाव वसवले अशी आख्यायिका आहे. गावात श्री दुर्गा देवीचे देऊळ आहे. अशी गोष्ट आहे कि ,  श्री सिद्धपुरुष एकदा शेत नांगरताना शेतात त्यांना देवीची मूर्ती सापडली आणि त्यांनी तिथेच दुर्गा देवीचे देऊळ बांधले. असेही म्हटले जाते , अजूनही गावात रात्री १२ वाजता  श्री सिद्धपुरुष पांढरा शुभ्र घोडा आणि पांढरी वस्त्रे  परिधान करून गावात एक फेरी मारतात . गावतील काही भाग्यावान्तानी घोड्याच्या टापांचा आवाजही ऐकला आहे. गावात  श्री सिद्धपुरुष ह्यांचे देऊळ आहे. दुर्गा देवीच्या देवळाचे  वैशिष्ट्य म्हणजे देवळातील प्रत्येक खांबावर वेगळे नक्षीकाम केलेले आहे. देवळात चिमाजी अप्पा पेशवे ह्यांनी पोर्तुगीजन बरोबरच्या युद्धात मिळवलेली मोठी घंटा आहे.  देवळाच्या मागच्या बाजूला तळे आहे.
       दरवर्षी चैत्रात देवीचा उत्सव, रथ गावात फिरून साजरा केला जातो. तसेच अजूनही गावात दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता चौघडा वाजतो. गावात वरची पाखाडी आणि खालची पाखाडी असे दोन भाग आहेत . पाखाडी म्हणजे एका बाजूला दगडी चीरांचा कट्टा आणि बाजूला खाली असणार्या भागास बिदी असे म्हणतात. अशी रचना असण्याचे कारण म्हणजे पावसात घराजवळ पाणी येऊ नये म्हणून हे पाखाडी . बदलत्या काळानुसार आता वरची पाखाडी जावून तिथे डांबरीकरण झाले आहे. परंतु खालची पाखाडी अजूनही आहे तशीच आहे.   
    मुरुड  हे श्री . श्री. ना. पेंडसे ह्यांचे गाव . ज्यांनी गारंबीचा बापू हे पुस्तक लिहिले. तसेच ज्येष्ठ समाजसुधारक श्री . महर्षी  धोंडोकेशव कर्वे ह्यांचे जन्मगाव . आज  गावात गावकऱ्यांनी महर्षी स्मारक म्हणून वास्तू
  बांधली आहे. त्यात महर्षींनी वापरलेल्या सर्व गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत . हे स्मारक सर्व पर्यटकांसाठी खुले आहे . गावात इयत्ता १० वी पर्यंत शाळा आहे . १० वर्षांपूर्वीचे मुरुड गाव आणि आत्ताचे ह्यात बराच कायापालट झालेला आहे . आज घरोघरी पर्यटकांसाठी राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते.  
    मुंबई पासून मुरुड  7 तासाच्या अंतरावर आहे. आणि पुण्यापासून ५ तासावर आहे . त्यामुळे साहजिकच इथे येणारे पर्यटक जास्त करून पुण्यातून येणारे आहेत . तसेच पुणेकरांना समुद्राचे जास्त आकर्षण आहे. नोकरी धंद्यानिम्मिताने जे गावातील लोक बाहेर आहेत ते दरवर्षी न चुकता गणपती, दिवाळी , शिमगा (होळी ) अशा सणांना आवर्जून घरी जातात . 
    असे निसर्गाचे वरदान लाभलेल्या मुरुडला  जरूर भेट द्यायलाच हवी. मुरुड गाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे .