Thursday, 7 June 2012

हेदवी - श्री दशभुज गणपती 
          गुहागर पासून २५ किलोमीटर अंतरावर हेदवी हे गाव आहे. किल्लेवजा तटबंदीने वेढलेले थोड्या उंचीवरील गणेश मंदिर. वर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि थेट प्रवेशद्वारापर्यंत रस्ताही आहे. दगडी तटबंदी , आजूबाजूचा परिसर , फुलबाग आणि पाश्वभूमीवर दिसणारी मंदिराची दगडी वास्तू यामुळे  प्रथम दर्शनीच पर्यटक प्रेमात पडतो. इतर पर्यटन स्थळांप्रमाणेच हेदवी गणेशाची पण काहीशी कथा सांगितली जाते. 
मंदिर 
     पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे गणेशभक्त राहत होते. त्यांची पुण्याला पेशव्यांशी भेट झाली असता त्यांना वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना त्या काळी मंदिर बांधण्यासाठी १ लाख रुपये दिले . त्या पैशातून केळकर स्वामिनी हे मंदिर उभारले. गणपतीची मूर्ती काश्मीर मधील पाषाणापासून बनवलेली आहे. दहा हातांच्या या मूर्तीच्या मांडीवर सिद्धलक्ष्मि विराजमान आहेत. उजव्या वरच्या हातात चक्र , दुसऱ्या हातात त्रिशूळ , तिसऱ्या हातात धनुष्य , चौथ्या हातात गदा आणि पाचव्या आशीर्वादाच्या हातात महाळूंग फळ आहे. डाव्या हाताच्या वरच्या हातात कमाल , दुसऱ्या हातात पाश , तिसऱ्या हातात नीलकमळ , चौथ्या हातात रदन (दात ) , आणि पाचव्या हातात धान्याची लोंबी आहे. सोंडेत अमृतकुंभ म्हणजे कलश आहे. मूर्तीचे कोरीवकाम उत्कृष्ट असून गळ्यात अनेक प्रकारच्या माळा आहेत. सिंव्हासनावर उंदीरही कोरलेला आहे. सभामंडपात गाभाऱ्याच्या प्रवेशभिंतीवर जय विजय या द्वारपालांच्या चतुर्भुज मूर्ती आहेत आणि बाहेरील बाजूला पिसारा फुलवलेल्या मोराच्या प्रतिमा आहेत.  मंदिर आवारातच दीपमाळही आहे 

No comments:

Post a Comment