Thursday, 13 December 2012

रत्नागिरी
                         रत्नागिरी हे नाव निश्चित कसे पडले ह्याच्या माहिती नाही . पण ऐकीव माहिती नुसार "रतनगिरी" नावाचे साधू विजापूर हून येथे आले , त्यांच्या वरून हे नाव पडले असचे असे मानण्यात येते.
रत्नागिरी जिल्ह्याची विभागणी तीन विभागात होते . विभाग पहिला - रत्नागिरी शहर , विभाग दुसरा गणपतीपुळे ते जयगड आणि विभाग तिसरा भाट्ये ते राजापूर .
 विभाग पहिला - रत्नागिरी शहरामध्ये भगवती(रत्नदुर्ग ) किल्ला, काळा  - पांढरा समुद्र , लोकमान्य टिळक जन्मस्थान , पतित पावन मंदिर , सावरकर स्मारक , थिबा प्यालेस ,सावरकर कोठडी .

 भगवती ( रत्नदुर्ग ) किल्ला


                रत्नदुर्ग , रतनगड किंवा भगवती किल्ला या नावानी ओळखला जाणारा हा किल्ला शिलाहार कारकिर्दीत गोव्याचा  राजा विजय मार्क देव याचा मुलगा भोजदेव  (राजा भोज ) याने इ .स .१२०५ मधेय बांधला अशी माहिती  मिळते.  घोड्याच्या नालासारखा आकार असलेला १०२ एकर क्षेत्रफळाचा हा किल्ला सुपारे १३०० मीटर  लांब आणि १००० मीटर  रुंद आहे . एकूण २७ बुरुज असलेल्या ह्या किल्ल्याचे सामान्यपणे तीन भाग पडतात - पेठ किल्ला , परकोट , आणि बालेकिल्ला . लांबवर पसरलेली किल्ल्याची दगडी तटबंदी , उजवीकडे खालच्या बाजूला काळा  समुद्र , मांडवी नदी , भाट्याचा खाडी पूल , सुरूबन, थिबा point, अतर डावीकडे भगवती बंदर , पांढरा  समुद्र , आणि मुख्य म्हणजे तीन भागात पसरलेला संपूर्ण किल्ला आमि अमर्याद विस्ताराचा निळाशार सागर .......... खरे तर वर्णन करू तितके थोडेच !!        

 काळा आणि  पांढरा  समुद्र

                 भगवती किल्ल्यावरच्या  दीपस्तंभाच्या उंचीवरून शहराकडे तोंड करून उभे राहिल्यास एकाचवेळी डाव्या बाजूस पंधरा तर उजवीकडे काळा  समुद्र दिसतो. रेती पांढरी असल्याने पाणी पांढरे आहे तर दुसरीकडे काळी रेती असल्याने पाणी काळी  दिसते . काळा समुद्र असलेला भाग म्हणजे मांडवी बंदर , या बंदरावर मुंबईच्या गेट  वे ऑफ इंडिया च्या धर्तीवर गेट वे ऑफ रत्नागिरी अशी प्रवेश कमान उभारण्यात आलेली आहे.

लोकमान्य टिळक जन्मस्थान

टिळकांचा जन्म रत्नागिरी शहरात २३ जुलै १८५६  रोजी  टिळक आळीत  झाला. टिळकांचे मुल गाव दापोली -दाभोळ रस्त्यावर चिखलगाव ज्या ठिकाणी आता त्यांच्या घराच्या जोत्यावर टिळक मंदिर आहे . जन्मानंतर टिळकांचे रत्नागिरी मधेय १०  वर्ष वास्त्याव्य होते .
                                                                                                                                                                                                      

Sunday, 12 August 2012

गणपतीपुळे


                                मुंबईतून रत्नागिरी कडे जायला निघाल्यावर वाटेत एक निवळी फाटा लागतो तिथून गणपतीपुळे पर्यंत साधारण ३५ किलो मीटर चा वळनावळनांचा रस्ता आहे. पर्यटकांचे अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. इथले गणेश मंदिर , विस्तीर्ण सागर तीर , हिरवाई आणि कोकणी पाहुणचार ह्यामुळे ह्या स्थानाला पर्यटकांची जास्त पसंती मिळते. 
                                 गणपतीपुळ्याच्या गणेश स्थापनेमागची कथा सुमारे ४५० वर्षांपूर्वीची आहे. आज ज्या ठिकाणी देऊळ आहे त्या ठिकाणी पूर्वी केवड्याचे बन होते.   जवळच्या उंडी गावातील एक ब्राह्मण वास्तव करण्याच्या उद्देशाने इथे आले , मोगलाइच्या काळात त्यांच्यावर संकट कोसळले, गणेशभक्त असणाऱ्या ह्या ब्राह्मणाने मनोभावे मंगल मूर्तीची पूजा केली , आणि ' संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करेन ' असा निश्चय करून इथल्या केवड्याचा बनत उपासना सुरु केली . " मी  आगरगुळ्याहून( पावस जवळील गणेशगुळे) पुळ्यास आलो आहे. दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त असे माझे स्वरूप असून माझे निराकार स्वरूप डोंगर आहे , माझी सेवा , पूजा अर्चा कर म्हणजे तुझे संकट दूर होईल " , असा दृष्टांत त्यांना उपसानाकाळात झाला. त्यानुसार केवड्याच्या बनत शोध घेतल्यानंतर त्यांना दृष्टांतानुसार श्री गणेशाची मूर्ती सापडली , त्यावर केंबळी छप्पर उभारून त्या ठिकाणी श्री गणेशाची पूजा अर्चा सुरु झाली. 
                         हा दृष्टांत आणि गणपतीपुळयास  सापडलेल्या श्री गणेश मूर्तीचा संबंध पावस जवळील गणेश गुळे येथील मंदिराशी जोडलेला आहे . ज्यावेळी ब्राह्मणास दृष्टांत होऊन मूर्ती सापडली त्याच सुमारास गणेश गुळे मंदिरातील पाण्याचा नैसर्गिक झरा बंद झाला , त्यामुळे "गुळ्याचा गणपती पुळ्यास" गेला  अशी म्हण म्हटली जाते. समुद्राच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर म्हणजे पुळणीवर गणपती प्रकट झाला म्हणून "गणपतीपुळे " हे नाव पडले .हिंदुस्थानच्या आठ दिशांना द्वारदेवता आहेत . त्यापैकी पुळ्याचा गणपती हे पश्चिमद्वार देवता मानली जाते.
                        श्री गणेश मंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्तसमयीची किरणे थेट गणेशमूर्तीवर  पडतात .  
                  असे हे गणपतीपुळे पर्यटकांचे  अतिशय लोकप्रिय ठिकाण ! इथे पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे , तरीही येणाऱ्या पर्यटकांनी भक्ती स्थानाचे पावित्र्य आणि इथला निसर्ग सांभाळणे हे त्यांचे कर्तव्य आहे. 
                         

Thursday, 5 July 2012

काताळे  जेट्टी
             धोपावे -दाभोळ येथे असणाऱ्या फेरीबोट  प्रमाणेच तावासाळ च्या पुढे  काताळे येथे फेरी बोट सेवा सुरु करण्यात आली आहे. यामधून वाहने घेऊन पलीकडे सैतवडे गावात जाता येते . तिथून केवळ 15-16 किलोमीटर वर जयगड , गणपतीपुळे  , आणि रत्नागिरी अशा ठिकाणी जाता येते. किंवा बोटीने थेट जयगड बंदरात सुद्धा जाता येते. 

राई  - भातगाव पूल 
रत्नागिरी कडे जाताना  राई  - भातगाव पूल 

           गुहागर तालुक्यातील टोकाचे गाव म्हणजे भातगाव आणि रत्नागिरी तालुक्यातील राई या गावांना जोडणाऱ्या पुलामुळे गुहागर - रत्नागिरी हे अंतर 50किलोमीटर ने कमी झाले आहे. तव्सालच्या पुढे भातगाव मार्गे जाणारा रस्ता फारच रमणीय आहे. कधी दोन्ही बाजूला दात झाडीचे डोंगर तर कधी एका बाजूला खोल दरी जंगलातून जाणारा नागमोडी रस्ता कधी संपतो ते काळातही नाही . 
         काताळे जेट्टी  आणि राई भातगाव पुलामुळे थेट गणपतीपुळे , मालगुंड , जयगड , या स्थळांना भेट देऊन रत्नागिरीस जाणे फारच सोयीचे झाले आहे. या सोयी पर्यटकांसाठी निश्चितच स्वागतहर्या  आहेत.   

Thursday, 28 June 2012

चिपळूण मधील पर्यटन स्थळे :
श्री क्षेत्र परशुराम 
       मुंबई - गोवा महामार्गावर खेड नंतर  चिपळूणच्या अगोदर 10 किलोमिटर  डाव्या बाजूस रस्त्याने वर गेल्यावर आपण श्री क्षेत्र परशुराम इथे पोहोचतो . या रस्त्याला परशुराम घाटी असेही म्हणतात .
      विष्णूंचा  सहावा अवतार मानलेले भगवान परशुराम हे जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचे सुपुत्र . त्यांचे मुळ  नाव भार्गवराम . परंतु परशु या शास्त्राने त्यांनी शत्रूंचा नाश केला म्हणून त्यांना सर्व परशुराम म्हणून लागले. त्यांनी जिंकलेली सर्व भूमी कश्यप ऋषींना दान केल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी समुद्र मागे हटवून जी भूमी निर्माण केली तेच आजचे "कोकण ". त्यानंतर श्री परशुराम महेंद्र पर्वतावर स्थायिक झाले आज त्याच जागी परशुराम मंदिर उभे आहे . मंदिराच्या सभोवताली  दगडी तट  असून आत येण्यासाठी प्रमुख आणि दुसर्या बाजूला लहान दरवाजे आहेत. परशुराम मंदिरात मध्यभागी परशुरामाची , डावीकडे कामाची आणि उजवीकडे काळाची  मूर्ती आहे.  

सवतसडा 


परशुराम घाटिनंतर सपाटीला लागण्यापूर्वी डाव्या हाताला एक सुंदर धबधबा ऐईन पावसाळ्यात बघायला मिळतो . कड्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी , खालून वाहणारा  खळखळता ओढा  आणि आजूबाजूची हिरवाई यामुळे इथे थांबणे अपरीहार्य ठरते. सवतीमत्सरातून दोन्ही सवतीनचा या कड्यावरून खाली पडून  अंत  झाला . म्हणून यास "सवतसडा" असे वेगळेच नाव पडले  असावे.   

डेरवण शिवसृष्टी 


चिपळूण पासून 20 किलोमिटर  अंतरावर वालावलकर  ट्रस्ट मार्फ़त छत्रपति शिवाजी महाराजांच्या जिवनातील स्फूर्तिदायी प्रसंगावर आधारित शिवसृष्टि उभारली आहे. सिमेंट मधेय घडवलेल्या मुर्त्यांद्वारे मंडपाच्या भिंतीवर शिवजन्म , आग्र्याहून सुटका , अफजलखानाचा वध , शायीस्तेखानाचे पलायन अशा अनेक प्रसंगांचे देखावे उभे केले आहेत. महाराष्ट्राचा चैतन्यदायी इतिहास नव्या पिढीला ज्ञात करून देण्यात शिवसृष्टी चा हेतू सध्या होतो. 


श्री विन्ध्यवासिनी देवी 


नंद आणि यशोदेची मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव देवकीच्या कोठडीत पोहोचली तिला कंवसाने ठार मारण्यासाठी उचलले तेव्हा ती त्याच्या हातून निसटली आणि विन्ध्य पर्वतावर जावून राहिली तीच  ही विन्ध्यवासिनी.
देवीची मूर्ती 800-1000 वर्ष जुनी असून मूर्तीला   8 हात आहेत   आणि मूर्ती महिषासुरमर्दिनी रुपात आहे.
असे हे चिपळूण शहरही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.  

Thursday, 14 June 2012

श्री वेळणेश्वर   मंदिर - गुहागर  
श्री वेळणेश्वर 
           वेळणेश्वर या समुद्र काठच्या गावाला सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. गुहागर पर्यटन स्थळा मधेय  वेळणेश्वर गावचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तीव्र उतारांचा वळनावळनांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो.  वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर गाव आहे. सुमारे  1200 वर्षांपूर्वीपासून गाव इथे वसलेले आहे.  वेळणेश्वर  मंदिराचा इतिहास  म्हणजेच या गावाचा इतिहास आहे. 
श्री वेळणेश्वर मंदिर  
           सभोवताली नारळ - पोफळीच्या बागा , सुरक्षित  आणि स्वच्छ समुद्र किनारा आणि लाटांच्या गाजेचे पार्श्वभूमीवर  वेगळेपण जाणवते. वेला  म्हणजे समुद्र किनारा , त्या तीरावर असणारा देव तो  वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून  वेळणेश्वर . येथील  गावकऱ्यांच्या मते 12 व्या शतकात इथे छोटे मंदिर होते त्यावेळी त्यास " वेळोबा " म्हणत. 
              मंदिर आवर खूपच मोठे आहे. त्यामाधेय 9-10 मित्र उंचीची दीपमाळ  आहे. घुमटाकार  शिखराचा सभामंडप , बाहेर पितळी  ओटा , त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे  आणि त्यावर पाच फन्यांचा  नाग आहे. गाभाऱ्यात  अडीच - तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवट ठेवून पोशाख  घालतात शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर  कालीमाता , महिषासुरमर्दिनी , गोपाळकृष्ण यांच्या पंच धातूच्या तर विठ्ठल रखुमाई ची पाषाण  मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागुनच श्री काळ भैरव , श्री  गणपती , श्री लक्ष्मि नारायण अशी मंदिरे आहेत . स्थानिक  लोक या काळ भैरवाला कौल  लावताना पहायची संधी मिळाल्यास ती जरूर बघावी. 
 वेळणेश्वर समुद्र 
          वेळणेश्वर समुद्र किनाऱ्याचा विशेष उल्लेख करावा लागेल , स्वच्छ आणि सुरक्षित अशा समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे त्याला " मेरुमंडल "   म्हणतात. 
             इथे  येणाऱ्या  पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स वगैरे  आहेत. तसेच  वेळणेश्वर  भक्त निवसातही उत्तम सोय  होऊ शकते. अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवीच !  

Thursday, 7 June 2012

हेदवी - श्री दशभुज गणपती 
          गुहागर पासून २५ किलोमीटर अंतरावर हेदवी हे गाव आहे. किल्लेवजा तटबंदीने वेढलेले थोड्या उंचीवरील गणेश मंदिर. वर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि थेट प्रवेशद्वारापर्यंत रस्ताही आहे. दगडी तटबंदी , आजूबाजूचा परिसर , फुलबाग आणि पाश्वभूमीवर दिसणारी मंदिराची दगडी वास्तू यामुळे  प्रथम दर्शनीच पर्यटक प्रेमात पडतो. इतर पर्यटन स्थळांप्रमाणेच हेदवी गणेशाची पण काहीशी कथा सांगितली जाते. 
मंदिर 
     पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे गणेशभक्त राहत होते. त्यांची पुण्याला पेशव्यांशी भेट झाली असता त्यांना वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना त्या काळी मंदिर बांधण्यासाठी १ लाख रुपये दिले . त्या पैशातून केळकर स्वामिनी हे मंदिर उभारले. गणपतीची मूर्ती काश्मीर मधील पाषाणापासून बनवलेली आहे. दहा हातांच्या या मूर्तीच्या मांडीवर सिद्धलक्ष्मि विराजमान आहेत. उजव्या वरच्या हातात चक्र , दुसऱ्या हातात त्रिशूळ , तिसऱ्या हातात धनुष्य , चौथ्या हातात गदा आणि पाचव्या आशीर्वादाच्या हातात महाळूंग फळ आहे. डाव्या हाताच्या वरच्या हातात कमाल , दुसऱ्या हातात पाश , तिसऱ्या हातात नीलकमळ , चौथ्या हातात रदन (दात ) , आणि पाचव्या हातात धान्याची लोंबी आहे. सोंडेत अमृतकुंभ म्हणजे कलश आहे. मूर्तीचे कोरीवकाम उत्कृष्ट असून गळ्यात अनेक प्रकारच्या माळा आहेत. सिंव्हासनावर उंदीरही कोरलेला आहे. सभामंडपात गाभाऱ्याच्या प्रवेशभिंतीवर जय विजय या द्वारपालांच्या चतुर्भुज मूर्ती आहेत आणि बाहेरील बाजूला पिसारा फुलवलेल्या मोराच्या प्रतिमा आहेत.  मंदिर आवारातच दीपमाळही आहे 

Thursday, 31 May 2012

बामणघळ  - हेदवी
                      हेदवीच्या समुद्र किनाऱ्यावर , सुरुच्या दाट सावलीत समुद्रावरचा भन्नाट वारा घेत निवांत बसने हा एक सुखद अनुभव आहे. या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग चमत्काराचे एक रौद्र दर्शन घडते. समुद्राकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या बाजूला दिसणाऱ्या उमा - महेश्वराच्या मंदिराच्या बाजूने डोंगराच्या कडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी  भेग दिसते. येथे डोंगरावर वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी धडकून एक अरुंद घळ तयार झाली असून येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. या कपारीत पाणी घुसून जोरात वर उसळते. 
                       या ठिकाणी गावातील लोकांकडून एक कथा ऐकायला  मिळते , वेळ रात्रीची होती , कोणी एक ब्राह्मण या वाटेने चालला होता , या घळीची त्यास माहिती नव्हती . त्याचा पाय घसरला आणि या घळीने त्यास पोटात घेतले .तेव्हापासून बहुतेक याला  "बामणघळ " असे नाव पडले.  

बुधल सडा 


अर्धवर्तुळाकार उथळ  पुळण  
            बुधल हे सर्वसामान्य पर्यटकांना फारसे  माहिती नसणारे ठिकाण . गुहागर पासून साधारण २० किलोमीटर अंतरावर. बुधालाची अर्धा कि.मी. लांबीची अर्धवर्तुळाकार उथळ  पुळण हेच या गावाचे प्रमुख आकर्षण आहे. 
प्रवाळयुक्त दगड  (Basalt rocks)
             येथील निळे पाणी इतके स्वच्छ आणि नितळ आहे कि पाण्याखालची दोन - तीन फुटावरची जमीन दिसते. बाजूला दोन्हींकडे उंच टेकड्या आणि मध्ये छोटीशी पुळण आहे. टेकडीच्या बाजूला  खडकांवर लाटांचे सतत थैमान सुरु असते. कपारीत जावून घुसळणारे पाणी , २-३ मी. उंच उडणारे शुभ्र कारंजे न त्याच्याशी होणारे काळ्या दगडांची टक्कर , अत्यंत सुंदर दृश्य बघावयास मिळते. परंतु हे दृश्य दुरूनच पाहणे योग्य , कारण हा प्रवाळयुक्त दगड आहे.