बामणघळ - हेदवी
हेदवीच्या समुद्र किनाऱ्यावर , सुरुच्या दाट सावलीत समुद्रावरचा भन्नाट वारा घेत निवांत बसने हा एक सुखद अनुभव आहे. या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग चमत्काराचे एक रौद्र दर्शन घडते. समुद्राकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या बाजूला दिसणाऱ्या उमा - महेश्वराच्या मंदिराच्या बाजूने डोंगराच्या कडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते. येथे डोंगरावर वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी धडकून एक अरुंद घळ तयार झाली असून येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. या कपारीत पाणी घुसून जोरात वर उसळते.
या ठिकाणी गावातील लोकांकडून एक कथा ऐकायला मिळते , वेळ रात्रीची होती , कोणी एक ब्राह्मण या वाटेने चालला होता , या घळीची त्यास माहिती नव्हती . त्याचा पाय घसरला आणि या घळीने त्यास पोटात घेतले .तेव्हापासून बहुतेक याला "बामणघळ " असे नाव पडले.
बुधल सडा
अर्धवर्तुळाकार उथळ पुळण |
बुधल हे सर्वसामान्य पर्यटकांना फारसे माहिती नसणारे ठिकाण . गुहागर पासून साधारण २० किलोमीटर अंतरावर. बुधालाची अर्धा कि.मी. लांबीची अर्धवर्तुळाकार उथळ पुळण हेच या गावाचे प्रमुख आकर्षण आहे.
प्रवाळयुक्त दगड (Basalt rocks) |
येथील निळे पाणी इतके स्वच्छ आणि नितळ आहे कि पाण्याखालची दोन - तीन फुटावरची जमीन दिसते. बाजूला दोन्हींकडे उंच टेकड्या आणि मध्ये छोटीशी पुळण आहे. टेकडीच्या बाजूला खडकांवर लाटांचे सतत थैमान सुरु असते. कपारीत जावून घुसळणारे पाणी , २-३ मी. उंच उडणारे शुभ्र कारंजे न त्याच्याशी होणारे काळ्या दगडांची टक्कर , अत्यंत सुंदर दृश्य बघावयास मिळते. परंतु हे दृश्य दुरूनच पाहणे योग्य , कारण हा प्रवाळयुक्त दगड आहे.