श्री केशवराज मंदिर
दापोली पासून कर्दे - मुरुड ला येताना वाटेत आसूद नावाचे अत्यंत छोटे गाव लागते. दापोली मुरुड रस्त्यावर आसूद गाव , अतिशय शांत - निवांत अशा टुमदार वस्तीचे . तिथूनच जवळ श्री केशवराज मंदिर .डोंगरातून वाट काढत मंदिरात पोहोचावे लागते. वाटेत जाताना बहुताव्शी दाबके आडनावाच्या कुटुंबाची घरे लागतात . कारण आसूद हे गाव दाबके ह्यांचे आहे असे समजले जाते . गावात सर्वत्र कौलारू घरे . घराच्या मांडवावर सुपारी वळत टाकलेली दिसते.
नारळ , पोफळी , आंबा , काजू ह्यांच्या गर्द झाडीतून पायवाटेने मंदिरात जावे लागते. विशेषतः पावसाळ्यात येथे अतिशय नयनरम्य दृश्य बघावयास मिळते. हिरवेगार चहूकडे .. सकाळच्या वेळेस गेल्यास निरनिराळ्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावयास मिळतो. तसेच पावसाळ्यात खळ-खळ आवाज करत वाहणारा ओढा.
थोड्या पाऊल वाटेने गेल्यावर छोटासा पूल आहे , त्यावरून पुढे जाता येते. पण नंतर दमछाक करणारा चढ लागतो. ह्या चढत आता पायऱ्या झाल्या आहेत. साधारण १००-१५० पायऱ्या आहेत . त्यामुळे मंदिरात पोहोचणे शक्य होते. पायऱ्या चढताना आजूबाजूच्या झाडीत करवंदाची झाडे दिसतात . दमछाक करणारी चढण चढून गेल्यावर मात्र आपण देवळाच्या ठिकाणी पोहोचतो . हे मंदिर डोंगरावर असल्याने वरती गेल्यावर थंड हवेच्या स्पर्शाने सगळा थकवा निघून जातो.
|
झाडांच्या बुंध्यातून येणारे पाणी
|
|
गोमुख
|
मंदिराच्या चारही बाजूने गर्द झाडी असलेलेला असा हा परिसर आहे. हे मंदिर पेशवेकालीन बांधणीचे असून मंदिरावर पावसापासून बचावासाठी कौलारू छप्पर घातलेले आहे. गाभाऱ्यात श्री विष्णूची मूर्ती पाहून मन प्रसन्ना होते. दक्षिणाभिमुख असलेल्या या मंदिराच्या डाव्या बाजूला गणेश मूर्ती आहे . ह्या देवळाच्या आवारात असणाऱ्या गोमुखातून बाराही महिने पाणी वाहत असते. ह्या पाण्याचा उगम त्या पाठीमागील डोंगरातून झालेला आहे. गोमुखातून वाहणारे पाणी डोंगरातल्या दोन झाडांच्या बुंध्यातून येते असे येथे संगेतले जाते, त्यामुळे ह्या पाण्याची चवही अत्यंत गोड आहे. आणि हा जिवंत झरा वर्षानुवर्ष वाहता आहे. गावात असे सांगितले जाते कि , देऊळ वरती डोंगरात असल्याने येथे रोज रात्री व्याघ्र येतो असे म्हटले जाते. रात्री वाघ देवळात वस्तीस असतो असेही सांगितले जाते. काही लोकांनी वाघाच्या पंज्याचे ठसे बघेतले आहेत.
येणाऱ्या पर्यटकांचे वाढते प्रमाण बघून , गावात घरोघरी राहण्याची आणि जेवणाची सोय केलेली आहे. फक्त त्यासाठी आगाऊ १-२ तास सूचना द्यावी लागते. तसेच गावातच काही खास कोकणी मेवाही विकत मिळतो.
श्री व्याघ्रेश्वर मंदिर
|
भवानी शंकर श्री व्याघ्रेश्वर कुलदेवता प्रसंनास्तु
|
आसूद गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठाशी श्री व्याघ्रेश्वर मंदिर आहे.आसूदच्या रस्त्याने पुढे गेल्यावर जोशी आळीच्या पुढे व्याघ्रेश्वर मंदिराच्या बोर्ड दिसतो. तिथून पायऱ्या उतरून देवळात जाता येते. व्याघ्रेश्वर भक्त निवासाच्या पाठीमागून डांबरी छोटा रस्ता थेट देवळापर्यंत जातो. पायऱ्या साधारण ४० आहेत. त्या उतरताना पुढे एक साकव लागतो. साकव म्हणजे लाकडाचा पूल , परंतू आता तिथे चांगला पूल झालेला आहे. श्री व्याघ्रेश्वेराचे मंदिर हे साधारण ८०० वर्षांपूर्वीचे असून शंकराचे जागृत स्थान आहे. तसेच अंकांचे कुलदैवतही आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर दीपमाळ दिसते, मंदिरात बाहेर काळ्या पाषाणाचा नंदी आहे. मंदिराला चारही बाजूने पाच फुटी उंचीची दगडी भिंत आहे.
मंदिराच्या आतील बाजूस लाकडी खांब असून त्यावर दशावतार कोरलेले आहेत . मंदिराच्या बाहेर श्री गणपती आणि श्री दत्ताची छोटी मंदिरे आहेत. देवळाच्या शेजारी एक विहीर आहे , आणि तिचे वैशिष्ट्य म्हणजे बांधकामाच्या तळाशी लाकडी चौकट असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या बाजूला दोन देवळे आहेत. एक म्हणजे काळ भैरवाचे आहे , आणि दुसरे झोलाई देवीचे आहे.
ह्या देवळाचा उल्लेख मराठी चित्रपट " गारंबीचा बापू " ह्यात केलेला आहे.