Friday, 27 April 2012

गुहागर
                               गुहागर नाव हे काहीश्या पुराण कथेवरून आहे असे समजले जाते. गुह म्हणजे कार्तिकस्वामी आणि त्यांनी सव्रक्षण केलेले आगर म्हणजे गुहागर . तसेच गुहा म्हणजे बुद्धी तिचे आगर म्हणून गुहागर अथवा , पूर्वी गुहागर येथे मोठ्या प्रमाणावर गो (गाय ) गृहे (गोठे ) होते म्हणजे गुहागर . इतकी विविधता नावात आढळते. समुद्रकिनारपट्टीला  लागून असलेले गुहागर हे छोटेसे निसर्गरम्य गाव . गावाची रचना अत्यंत सुंदर आहे. गुहागर गाव हे एकूण ३ भागात विभागलेले आहे. खालचा पाट , वरचा पाट आणि देवपाट .एकच सलग रस्ता ,दुतर्फा नारळाची , सुपारीची झाडे आणि कौलारू घरे.  
                              गुहागरला पाहण्याजोगी बरीच ठिकाणे आहेत , व्याडेश्वर मंदिर , दुर्गा देवी मंदिर , उरफाटा गणपती , गोपाळगड ,बामनघळ ,  हेदवीचा दशभुजा गणपती , वेळनेश्वेर मंदिर.तसेच गुहागर ला जाताना वाटेत चिपळूण शहर लागते तिथेही अनेक पर्यटन स्थळे आहेत . परशुरामचे परशुराम मंदिर , डेरवण येथील शिवसृष्टी , सवतसडा धबधबा आणि विन्ध्यवासिनी देवीचे मंदिर. 
                             गुहागर मुंबई पासून साधारण ७ तासाच्या अंतरावर आणि पुण्यापासून ६ तासाच्या अंतरावर आहे.  मुंबई आणि पुण्याहून गुहागरला दापोली मार्गेही जाता येते , मुंबई - दापोली आणि दापोली हून दाभोळ ला जावून दाभोळ  ते धोपावे अशी जेट्टी मार्गे जाता येते. याशिवाय गुहागर ला जाण्यासाठी कोकण  रेल्वे चा पर्यायहि उपलब्ध आहे.  चिपळूण स्थानकावर उतरून तिथून ,  ST बस ने गुहागर ला जाता येते .  

Thursday, 12 April 2012

                                                                              वेळास  
          मुंबई दापोली रस्त्यावर दापोली कडे वळण्याऐवजी  सरळ मंडणगड वरून गेल्यावर वेळास हे छोटसं गाव लागते. नारळ , सुपारी , आंबा यांच्या झाडीत  वेळास हे गाव हरवले आहे. नाना फडणवीसांचे हे गाव .
 गावात प्रवेश करतानाच उंच दगडी जोत्यावर  नाना फडणवीसानी जीर्णोद्धार केलेली महादेव आणि  काल भैरव अशी दोन मंदिरे आहेत. रस्त्यापासून वर  चढून जाण्यास मोठ्या दगडी पायऱ्या आहेत. उजवीकडे दोन दीपमाळा आहेत . याशिवाय गावात दुर्गादेवीचे देऊळ आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध षष्टीला देवीचा उत्सव असतो. 
           गावातील मुख्यारास्त्याने सरळ गेल्यावर नाना फडणविसांच्या  वाड्याचे दगडी जोते दिसते. जोत्याच्या मध्यभागी दगडी चौथरा बांधून त्यावर नाना फडणवीसांचा अर्धा पुतळा बसवलेला आहे. 
     वेळासच्या निसर्ग्यारम्य समुद्र किनाऱ्यावर थंडीच्या शेवटी आणि उन्हळ्यात " ओलिव्ह रिडले टर्टल "  महोत्सव साजरा केला जातो. हल्लीच्या काळात ह्या कासवांची जात नष्ट होण्याच्या मार्गात आहेत .  म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ  ह्या संस्थे  अंतर्गत  हा कासव महोत्सव केला जातो. देश - परदेशातून अनेक कासव प्रेमी येथे भेट देतात . 
          ह्या छोट्याश्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावात राहण्यासाठी हॉटेल नाही परंतु खाजगी राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते.  

Friday, 6 April 2012

                                                           दाभोळ 
                दापोली पासून १ तासाच्या अंतरावर असणारे दाभोळ बंदर. पूर्वीच्या काळी , मुंबईहून येणार्यांना दाभोळ बंदरातच उतरावे लागे. प्राचीन काळी "दालभ्य" ऋषींच्या नावावरून दाभोळ हे नाव पडले असेल असे येथे मानले जाते. दाभोळ गावात शिरताना अनेक मनोहारी दृश्य पाहून वेड लागते. चिपळूण कडून येणारी वाशिष्टी नदी , समोर दिसणारा गोपाळगड, सुरूचे दाट बन , उंच माड आणि सूर्योदय , सूर्यास्ताच्या वेळी तर हे शोभा अवर्णीय असते.
श्री परशुराम पुतळा , बुरोंडी 
तामसतीर्थ 
      दापोली हून दाभोळ ला जाताना पर्यटकसाठी  अनेक निसर्ग्यरम्य ठिकाणे आहेत. बुरोंडी , लाडघर , कोळथरे आणि दाभोळ चे चंडिका मंदिर. वर्षाभारापुर्वीच बुरोंडी येथे श्री परशुरामाचा पुतळा बांधण्यात आलेला आहे. आणि तेव्हापासून ह्या भागाला चित्पावन भूमी म्हणून ओळखले जाते. तसेच ह्याच पुतळ्याच्या इथून दिसणारे तामसतीर्थ. तामसतीर्थ म्हणजे फोटोग्राफर साठी आणि पर्यटकांसाठी मेजवानीच . ह्याला तामसतीर्थ म्हणतात कारण येथील माती हि लाल (तांबड्या रंगाची ) आहे, त्यामुळे  पावसाळ्यात समुद्राच्या लाटांनी तिथल्या पाण्याच्या रंग लालसर होतो .लाडघर येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. बुरोंडी -लाडघर असा अत्यंत सुंदर समुद्रकिनारा आहे.
      लाडघर वरून तसेच सरळ पुढे गेल्यावर वाटेत कोळथरे गाव लागते. गाव अत्यंत छोटे आणि नारळ , सुपारीच्या बागांनी समृद्ध. गावात श्री कोळेश्वराचे मंदिर आहे. श्री कोळेश्वराचे मंदिर ३ भागांचे असून त्याभोवती दगडी फरसबंदी  आहे.संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आहे, ह्या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे . जगभर  प्रसिद्ध असलेली " आगोम  "  www.agom.in हे सूक्ष्म आयुर्वेदिक कंपनी . कोळथरे सारख्या छोट्या गावात ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेली हि कंपनी आहे. तसेच गावात कोळथरे पर्यटन विकास संघातर्फे घरातून राहण्याची आन भोजनाची सोय केली जाते.
चंडिका देवी 
    कोळथरे गावाहून सरळ गेले कि वाटेत चंडिका मंदिर लागते. दाभोळ च्या अलीकडे पठारावर चंडिका देवीचा स्वयंभू स्थान आहे.  एकसंथ दगडात नैसर्गिक गुहेमाधेय देवीची साडे ३ फुट , काळ्या पाषाणातील शेंदूर लावलेली  मूर्ती आहे. देवीला ४ हात असून हातात तलवार, ढाल अशी आयुधे आहेत. देवीचं मूर्तीजवळ एक इतिहासकाली तलवार असून ते छत्रपती शिवाजी महाराजांची आहे अशी पुजार्यांची श्रद्धा आहे. गुहेत जाताना ५-६ पायर्या उतरून आत जावे लागते.  गुहेत समई च्या प्रकाशात जावे लागते, या देवीला फक्त समई मंद प्रकाश चालतो  आणखी कोणताही चालत नाही असा येथील पुजारी सांगतात . इथून सरळ गेले कि दाभोळ बंदर येते .
     दापोली , कोळथरे , बुरोंडी , लाडघर या सर्व ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी भोजनाची आणि राह्यची सोय केली जाते.