Sunday, 12 August 2012

गणपतीपुळे


                                मुंबईतून रत्नागिरी कडे जायला निघाल्यावर वाटेत एक निवळी फाटा लागतो तिथून गणपतीपुळे पर्यंत साधारण ३५ किलो मीटर चा वळनावळनांचा रस्ता आहे. पर्यटकांचे अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. इथले गणेश मंदिर , विस्तीर्ण सागर तीर , हिरवाई आणि कोकणी पाहुणचार ह्यामुळे ह्या स्थानाला पर्यटकांची जास्त पसंती मिळते. 
                                 गणपतीपुळ्याच्या गणेश स्थापनेमागची कथा सुमारे ४५० वर्षांपूर्वीची आहे. आज ज्या ठिकाणी देऊळ आहे त्या ठिकाणी पूर्वी केवड्याचे बन होते.   जवळच्या उंडी गावातील एक ब्राह्मण वास्तव करण्याच्या उद्देशाने इथे आले , मोगलाइच्या काळात त्यांच्यावर संकट कोसळले, गणेशभक्त असणाऱ्या ह्या ब्राह्मणाने मनोभावे मंगल मूर्तीची पूजा केली , आणि ' संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करेन ' असा निश्चय करून इथल्या केवड्याचा बनत उपासना सुरु केली . " मी  आगरगुळ्याहून( पावस जवळील गणेशगुळे) पुळ्यास आलो आहे. दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त असे माझे स्वरूप असून माझे निराकार स्वरूप डोंगर आहे , माझी सेवा , पूजा अर्चा कर म्हणजे तुझे संकट दूर होईल " , असा दृष्टांत त्यांना उपसानाकाळात झाला. त्यानुसार केवड्याच्या बनत शोध घेतल्यानंतर त्यांना दृष्टांतानुसार श्री गणेशाची मूर्ती सापडली , त्यावर केंबळी छप्पर उभारून त्या ठिकाणी श्री गणेशाची पूजा अर्चा सुरु झाली. 
                         हा दृष्टांत आणि गणपतीपुळयास  सापडलेल्या श्री गणेश मूर्तीचा संबंध पावस जवळील गणेश गुळे येथील मंदिराशी जोडलेला आहे . ज्यावेळी ब्राह्मणास दृष्टांत होऊन मूर्ती सापडली त्याच सुमारास गणेश गुळे मंदिरातील पाण्याचा नैसर्गिक झरा बंद झाला , त्यामुळे "गुळ्याचा गणपती पुळ्यास" गेला  अशी म्हण म्हटली जाते. समुद्राच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर म्हणजे पुळणीवर गणपती प्रकट झाला म्हणून "गणपतीपुळे " हे नाव पडले .हिंदुस्थानच्या आठ दिशांना द्वारदेवता आहेत . त्यापैकी पुळ्याचा गणपती हे पश्चिमद्वार देवता मानली जाते.
                        श्री गणेश मंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्तसमयीची किरणे थेट गणेशमूर्तीवर  पडतात .  
                  असे हे गणपतीपुळे पर्यटकांचे  अतिशय लोकप्रिय ठिकाण ! इथे पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे , तरीही येणाऱ्या पर्यटकांनी भक्ती स्थानाचे पावित्र्य आणि इथला निसर्ग सांभाळणे हे त्यांचे कर्तव्य आहे.